Login

दोन नाती भाग १

दोन नाती भाग १
दोन नाती : दोन दृष्टिकोन
भाग १

" श्रावणी, अगं बाळ शांत झालंय का ? रडण्याचा आवाज थांबलाय म्हणून विचारलं..." सासूबाईंनी, सुलोचनाबाईंनी किचनमधूनच विचारलं.

श्रावणीने बाळाला हलकेच पाळण्यात ठेवलं. बाळाला पांघरून घातलं.एक दीर्घ श्वास घेतला.

" हो आई, नुकताच डोळा लागलाय त्याचा. आता कुठे शांत झालाय."
श्रावणीने हळूच उत्तर दिलं. तिचे डोळे झोपेने ओढले जात होते, कंबर दुखत होती. अशक्तपणा जाणवत होता.अंगात त्राण उरला नव्हता.

" बरं झालं! मग आता एक काम कर, बाळ झोपलय तोपर्यंत वाळत घातलेले कपडे काढून घे. तेवढं रात्रीच्या जेवणाचं वाटण करून ठेव. एकदा तो उठला की तुला काम सुद्धा करायला वेळ मिळणार नाही. आता हे उरकून घेतलंस की मग संध्याकाळी तो उठल्यावर तुला आरामात बसता येईल." सुलोचनाबाईंनी सहजपणे कामाची यादीच वाचून दाखवली.

श्रावणी सुन्न होऊन पलंगावर बसून राहिली. तिला वाटलं होतं, सासूबाई म्हणतील की
'जा, तूही थोडा वेळ डोळा मिटून घे.' पण तसं घडलं नाही. गेल्या सव्वा महिन्यापासून हेच सुरू होतं. बाळ झोपलं की श्रावणीसाठी विश्रांती नाही, तर उरलेली कामं उरकण्याची वेळ असायची.

तिने जड पावलांनी उठून मोबाईल हातात घेतला. आईचा मेसेज आला होता,

" बाळ झोपलं असेल तर फोन बाजूला ठेव आणि आधी झोपून घे. बाकी काही करू नकोस. तू थकली आहेस हे तुझ्या आवाजावरून समजतंय."

श्रावणीने आईला फोन लावला.

"आई..." तिचा आवाज कातर झाला.

"काय झालं गं श्रावू ? बाळ त्रास देतंय का? की तब्येत ठीक नाहीये तुझी ? " आईने काळजीने विचारलं.

" नाही गं, बाळ तर आता झोपलंय. पण मला खूप थकल्यासारखं होतंय आई. रात्री दोन-दोन तास त्याला घेऊन फिरावं लागतं, माझी झोपच होत नाहीये." श्रावणीला रडू आवरत नव्हतं.

" श्रावणी, ऐक माझं. बाळ झोपलंय ना, तर आता तू जगाचा विचार सोडून दे. जेवण, कपडे, कामं ही सगळी दुय्यम आहेत. तुझी तब्येत महत्त्वाची आहे. तू नीट राहिलीस तरच बाळाला नीट सांभाळू शकशील. जा, आता फोन ठेव आणि शांत झोप घे. कुणी काही विचारलं तर सांग मी सांगितलंय म्हणून." आईच्या मायेच्या शब्दांनी श्रावणीला थोडा धीर दिला.

पण फोन ठेवताच बाहेरून सुलोचनाबाईंचा पुन्हा आवाज आला,
"अगं श्रावणी, ऐकलंस का? तेवढं दूध गरम करून ठेव ग गॅसवर!"

श्रावणीने डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि ती किचनमध्ये आली.

"आई, माझं थोडं डोकं दुखतंय, झोपू का मी अर्धा तास ? " तिने धीर करून विचारलं.

सुलोचनाबाई हसून म्हणाल्या,
"अगं, बाळंतपणात डोकं तर दुखणारच. पण आता झोपलीस आणि बाळ पंधरा मिनिटांत उठलं तर कामं तशीच राहतील ना ?
मग रात्री तुलाच दगदग होईल. त्यापेक्षा आता उरकून घे आणि रात्री लवकर झोप. आपल्या काळी आम्ही कुठे झोपायचो दुपारी ? पाळणा हलवता हलवता सगळी घरची कामं आटोपायचो आम्ही."

श्रावणी काहीच बोलली नाही. तिने गॅसवर दूध ठेवलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची कोरडी तयारी सुरू केली. रूम मध्ये जाऊन कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. तिला राहून राहून आईचे शब्द आठवत होते. आई म्हणत होती,

" तू महत्त्वाची आहेस " आणि
सासूबाई म्हणत होत्या,

"कामं महत्त्वाची आहेत."

श्रावणीला प्रश्न पडला,

" आई आणि सासूमध्ये हाच फरक असतो का ? आईला आपल्या मुलीचा चेहरा दिसतो आणि सासूला आपल्या घरचा संसार ? आईला वाटते आपली मुलगी सुखात राहावी आणि सासूला वाटते आपल्या मुलाचा संसार सुरळीत चालावा ? "

संध्याकाळ झाली. साकेत ऑफिसमधून आला. त्याने पाहिलं की श्रावणी कोपऱ्यात बसून बाळाला थोपटत होती, पण तिचे डोळे मिटत होते. तिची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं.

" आई, श्रावणीला थोडा वेळ झोपू दे ना. मी बघतो बाळाकडे." साकेत म्हणाला.

"अरे, मी कुठे नाही म्हणतेय? पण बाळ झोपलं असताना तिने कामं उरकली असती तर आता तिला झोपता आलं असतं ना ? आता तर बाळाची खेळायची वेळ झालीये." सासूबाईंनी त्यांचं प्रॅक्टिकल उत्तर सांगितलं.

श्रावणीने साकेतकडे पाहिलं. ती फिकट हसली. तिला कोणावर राग नव्हता, पण तिला फक्त एका गोष्टीची ओढ होती.ती म्हणजे थोडी विश्रांती !

त्या रात्री श्रावणीला पुन्हा जाग आली. बाळ रडत होतं. तिने त्याला कडेवर घेतलं आणि खिडकीबाहेर पाहिलं. तिला जाणवलं की, जोपर्यंत ती स्वतःसाठी नाही म्हणायला शिकत नाही, तोपर्यंत सासूबाईंना तिची तगमग कळणार नाही. आणि सासूबाईंना तरी काय दोष द्यावा ? त्यांनीही त्यांच्या आयुष्यात हेच सोसलं होतं, हेच पाहिलं होतं. त्यांच्यासाठी कामं उरकणं हाच सुखी संसाराचा मंत्र होता.

पण श्रावणीला हा साखळदंड तोडायचा होता. तिला सासूबाईंना हे पटवून द्यायचं होतं की, ती मशीन नाहीये. एक माणूस आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा तेच घडलं. बाळ झोपलं. सुलोचनाबाईंनी किचनमधून आवाज दिला,

"श्रावणी, बाळ झोपलंय ना, तर तेवढं..."

पण यावेळी श्रावणीने उत्तर दिलं नाही. तिने सरळ बेडवर अंग टाकलं आणि डोळे मिटले. सुलोचनाबाई खोलीत आल्या आणि पाहतात तर काय... श्रावणी गाढ झोपली होती.

सुलोचनाबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"ही पोरगी ऐकत नाही."
असं पुटपुटत त्या किचनमध्ये गेल्या. पण काही वेळातच त्यांना श्रावणीच्या आईचा फोन आला... आणि त्या फोनवर जे काही बोललं गेलं, त्याने सुलोचनाबाईंच्या विचारांची दिशाच बदलून टाकली.

क्रमशः...

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →