Login

दुरावलेलं प्रेम भाग नऊ

सायली आदित्यला चांगल्या शब्दात सुनावते
मागील भागात आपण पाहिलं कि,आदित्य दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी कॅफेत गेला असताना सायली त्याच्या मागच्या टेबलावर बसून त्यांचं संभाषण ऐकत होती. त्या मुलीने आदित्यला लग्नाबद्दल विचारलं. त्यावर आदित्यने आपलं लग्न झालं असून त्याला पत्नी आणि मुलगी असल्याचं सांगितलं, पण तरीही ती मुलगी त्याला आवडते, अशी कबुली दिली. हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने शांतपणे त्यांच्या समोर जाऊनच त्याला मोठा धक्का दिला आणि आदित्यला घरी घेऊन आली. आता ती त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणार कि त्याला सोडून जाणार?? पाहूया पुढे...,


घरी पोहोचल्यावर सायलीने तिच्या मदतनीस ताईंना हाक मारली.

"ताई, जरा कडक दोन कप चहा करा..

ती हॉलमध्ये येऊन शांतपणे सोफ्यावर बसली.

आदित्य तिच्यासमोर मान खाली घालून उभा होता.थोड्याच वेळात मदतनीस ताईंनी त्यांना चहा आणून दिला. तस तिने त्यांना आरोहीला खाली खेळायला घेऊन जायला सांगितलं.. त्या दोघी गेल्यानंतर सायलीने त्याच्याकडे रोखून पाहिलं.

"आदित्य... तू फक्त एक पती नाही आहेस ,तर एका मुलीचा बाबा आहेस आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आदर्श शिकवणारा प्राध्यापक आहेस. मग हे डेटिंग अॅप, अनोळखी मुलींशी चॅटिंग, खोटं बोलणं... हे सगळं तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभतं का?"

ते ऐकून हॉलमध्ये काही क्षण पूर्णपणे शांतता पसरली.

आदित्यकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्याने फक्त मान खाली घातली व हळू आवाजात म्हणाला,

"सायली... माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला एक संधी दे.... शेवटची प्लीज..."

"संधी? मी तुला किती संधी दिल्या, आदित्य? प्रत्येक वेळी वाटलं, तू बदलशील... पण तू तर माझा विश्वासच मोडलास."

सायली रागात बोलली...

"मी तुझा अपराधी आहे. पण माझं ऐकून घे."

"आता काय ऐकायचं बाकी राहिलंय? रात्री दुसऱ्या मुलींशी चॅटिंग... खोटं बोलून त्यांना भेटायला जाणं... आणि माझ्यासमोर मात्र आदर्श नवऱ्याचा आव आणणं?"

ती रागात बोलली तस आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं.

"मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे."

"जाणीव आज झाली... कारण मी तुला पकडलं. मी पकडलं नसतं, तर अजून किती दिवस हे सगळं चाललं असतं?"

आदित्यकडे उत्तर नव्हतं तरी तो स्वतःला डिफेन्ड करत म्हणाला..,

" मान्य आहे... मी वाहवत गेलो.. पण तू खूप चिडचिड करायचीस मग मला कंटाळा यायला.. म्हणून मन रमवण्यासाठी मी त्याचा आधार घेतला.. पण मला त्याची एवढी सवय लागेल असं वाटलं नव्हतं..."

"म्हणजे ह्यात पण माझी चूक.... ठीक आहे मी तापट आहे... रागावते खूपदा.. पण त्यामागचं माझं प्रेम तू कधी समजून घेतलंस का?? मी बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक पाऊल तू पुढे टाकलस का?? तू एका कॉलेजचा प्राध्यापक आहेस. शेकडो विद्यार्थ्यांना संस्कार आणि नैतिकतेचे धडे देतोस. पण स्वतःच्या आयुष्यात तेच धडे पाळायला मात्र विसरलास."

आता मात्र त्याच्या कडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं...

"सायू......प्लीज... मला माफ कर.. चुकलं माझं...."

ते ऐकून सायली हलकंसं हसली.पण त्या हसण्यात वेदना होत्या.

"माफी शब्दांनी मिळत नाही, आदित्य... ती कृतीतून कमवावी लागते."

इतकं बोलून ती थोडं थांबली न परत म्हणाली...

"आजपासून माझा तुझ्यावरचा विश्वास संपला आहे. तो परत मिळवायचा असेल... तर आधी स्वतःला बदल."

तस आदित्यने हात जोडले मग तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि आदित्यच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाली,

"आदित्य... एक गोष्ट तू विसरलास."

आदित्यने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

"हे घर माझ्या नावावर आहे. त्यामुळे या घरातून बाहेर पडायची वेळ आली, तर बेघर मी नाही... तू होशील."

ते ऐकून आदित्य निःशब्द झाला. त्याने ह्याचा विचारच केला नव्हता.

सायली पुढे म्हणाली,

"आणि दुसरी गोष्ट म्हणजे ... तुझे आई-बाबा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतात. त्यांना जर तुझे हे उद्योग समजले, तर त्यांना किती धक्का बसेल याचा एकदा तरी विचार केलास का? मला खात्री आहे... ते माझीच बाजू घेतील."

एवढं बोलून ती थोडी थांबली......


काय वाटत तिने माफ करावं का????


क्रमश :-


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →