Login

त्रस्त गृहिणी फतवे

सरकारच्या फतव्यांमुळे वैतागलेली सर्व सामान्य महिला
त्रस्त गृहीणी फतवे

गेल्या पाच-सहा वर्षापासून सर्व सासुरवाशीणींनच्या मागे मेलं कुठलं शुक्ल काष्ठ लागलं आहे कुणास ठाऊक! नेमका उन्हाळा येतो, फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे परीक्षांचे भरघोस महिने सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहिणीची तारांबळ उडवून जातात. 2020 मध्ये कोरोना आला, तो बावीस पर्यंत चालला. त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटलं. आणि आता तर काय अमेरिकेतला तात्या नुसतं जीवावर उठला आहे सगळ्यांच्या.

एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत संपणाऱ्या मागल्या वर्षी पर्यंतच्या परीक्षा आता राज्य शासनाच्या शिक्षण मंत्र्यांच्या आदेशावरून पार 30 एप्रिल पर्यंत लांबल्या. बरं लांबल्यात लांबल्या पण फेब्रुवारी महिन्यात तिकडे कुठेतरी होर्मुझच्या समुद्रधुनीत होणाऱ्या युद्धामुळे इकडे भारतात स्वयंपाकाच्या गॅसचा भडका उडाला. आता तुम्ही सांगा वाचक हो! फेब्रुवारी महिन्यात माझ्या मुलीची दहावीची परीक्षा होती, त्यानंतर मार्चच्या शेवटी शेवटी माझ्या मुलाची तिसरीची परीक्षा सुरू झाली आता मी माझ्या मुलांच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला हवं होतं की स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या रांगेत उभे राहायला हवं होतं? मुलांचा अभ्यास न घेऊन सांगते कुणाला आणि घरात स्वयंपाक न करून रडते कुणाजवळ अशी माझी परिस्थिती झाली होती. म्हणून मी बिचारी बापुडी नवऱ्याला सिलेंडरसाठी रांगेत उभा करून रात्र-रात्र जागुन मुलांचा अभ्यास घेतला, शेवटी सिलेंडर मिळत नाही असं बघून मनात एक विचार चमकून गेला, की निदान दोन-चार दिवस तरी नवरा बाहेर हॉटेलात खायला तरी घेऊन जाईल तेही नाही केलं तर घरी पार्सल तरी घेऊन येईल, पण नवरा माझ्याही वरताण निघाला नवऱ्याने खास ‘माझ्यासाठी’ मी रोज दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक करावा या शुद्ध हेतूला अनुसरून “आपण इंडक्शन घेऊया असा प्रस्ताव मांडला.”

त्या क्षणी असं वाटलं की देवा असा कंजूस नवरा मलाच काय कुणालाच देऊ नकोस! केवळ त्याचा शब्द खाली पडू नये म्हणून मी नंदी बैलासारखी नुसतीच मान डोलावली.
पण तिथेही नवऱ्याचं कर्म आडवं आलं आणि रातोरात बाजारातून, आणि सो कॉल्ड ऑनलाइन मार्केट मधून सगळे इंडक्शन चुल्हे गायब झाले.

अशा या वाईट परिस्थितीतून निघताना एप्रिल महिना उजाडला. एकदाची मुलाची परीक्षा ही संपली. आणि मुलीचा दहावीचा निकालही लागला. लेकीने दहावीत अपेक्षा पेक्षा जास्तच घवघवीत यश मिळवलं होतं म्हणून आधीच ठरल्याप्रमाणे मी नवऱ्याला त्याने दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली.

“लेकीला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळेल तर मी तुम्हा सर्वांना परदेशवारी करून आणि हे विसरायचं नाही हां.” नवरा माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता त्यावेळी त्याच्या डोक्यात नक्की काय सुरू होतं हे मला लगेच कळलं.

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की सकाळी काय भाजी केली हे या बाईला रात्री आठवत नाही. भाजी काय केली तेही सोडा, पण भाजीत मीठ घातलं की नाही तेही तिला स्मरत नाही आणि आपण दिलेला शब्द मात्र हीच्या पक्क्या ध्यानात आहे. त्याने केवळ हो हो म्हणून ती वेळ मारून नेली आणि विजा पासपोर्ट आणि तत्सम काही बाही गोष्टी सांगून अंमळ परदेशवारीचे प्रकरण जेवढे लांबवता येईल तेवढे प्रकरण लांबवले.

शेवटी मी आणि माझी मुलगी अगदी हात घाईवर आल्यावर त्यांनी उगाच आमच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी मोठ्या दिलदार मनाने विचारलं

“कुठे जायचं मग परदेशात फिरायला?”

“कुठे म्हणजे काय? लंडन, पॅरीस, स्विझर्लंड.” उत्साहाच्या भरात मी पटापटा देशांची गावांची राज्यांची नावे सांगून दिली.

मुलीला मात्र ग्रीनलँड, फिनलँड, न्यूयॉर्क असं कुठेतरी जायचं होतं.

नवरा म्हणाला आता आपण परदेशात जाऊ शकत नाही कारण तिकडे उंदरांमुळे पसरणारा हंता व्हायरस आलेला आहे.

मनातल्या मनात मी हाय रे माझ्या कर्मा म्हटलं आणि परत बिलकुल माझा उत्साह कमी न होऊ देता आणखीन नवीन परदेशातली नावे सांगितली

“बरं मग असं करूया गेला बाजार सिंगापूर मलेशिया थायलंड बँकॉकला जाऊया.” माझा हा प्रस्ताव तर लेकीला आणि मुलाला अगदी मनापासून आवडला. नवऱ्याने ही मग हार मानुन ‘उद्या परवा तिकीटे मिळवण्यासाठी एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधतो’ असं नेत्यांप्रमाणे आश्वासन दिलं.

मला माहिती होतं नवरा या बाबतीत टाळणारच आहे. पण नवऱ्याने टाळण्यापूर्वीच आपल्या देशातल्या मुख्य नेत्याने सांगितलं परदेशवारी करायची नाही. विमानानेच काय स्वतःच्या दुचाकीनेही कुठे जायचं नाही. असा राग आला म्हणून सांगते तुम्हाला! आता ह्या नेत्यामुळे आमच्या कुटुंबाची सिंगापूर वारी बारगळली ना! आम्ही अजून पर्यंत मुंबई बघितली नाही तो भाग वेगळा.

माझ्या जखमेवर मीठ चोळायला नवरा लगेच म्हणाला “अगं कशाला एवढं मनाला लावून घेते? आजूबाजूच्या तुझ्या मैत्रिणींना (रिकाम टवळ्या) बोलावं आणि मस्त घरी पार्टी कर.” नवऱ्याच्या मनात काय सुरू आहे याचा मला अंदाज काही लागेना. मीही उत्साहाच्या भरात माझ्या मैत्रिणींना घरी बोलावलं.

“बरं झालं बाई आम्हाला बोलावलं निदान इथे तरी मनमोकळे बोलता येईल.” एक दुःखी मैत्रीण.

“का ग काय झालं? फारच डाऊन वाटते आहेस!” दुसरी समदुखी मैत्रीण.

“काय नाही ग नवरा मला या अधिक महिन्यात चांगलं चार-पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि तीन-चार तोळ्यांच्या पाटल्या करून देणार होता.”

“मग कुठे मांजर आडवी गेली.” अर्थातच मी

(ही मैत्रीण स्वतःच्या बढाया मारण्यात एक नंबर हे बाकी सगळ्या मैत्रिणींना माहिती होतं हा भाग वेगळा)

“मांजर कशाला आडवी जायला हवी? दोन-चार दिवसांपूर्वी नाही का पंतप्रधानांनी सांगितलं ‘वर्षभर सोनं खरेदी करू नका!’ झालं आमच्या घरच्या बोक्याने तेच लक्षात ठेवलं!” तिचा तो केवीलवाणा चेहरा बघून आमच्याच जीवात काही काहीतरी तट्ट तट्ट तुटलं!

(एक म्हातारा बोकाच आडवा गेला. हे ती कुणाला म्हणत होती ते आम्हाला न सांगताही कळलं)

मग तिसरी ही स्वतःची कर्म कहाणी सांगू लागली. “यावर्षी आम्ही चार चाकी गाडी घेणार होतो, मी तर माझ्या अहोंना स्पष्ट सांगितलं होतं, गाडी घ्यायची तर रोल्स रॉयल्स, लेम्बोर्गिनी किंवा मग गेला बाजार पोर्षे तरी घ्या. आपल्या स्टेटसला नको का शोभायला?”
(तिच्याकडे साधी दुचाकी ही नाही हे वेगळं सांगायला नको.)

तिच्या वाक्यावर बाकी सगळ्यांनी नाक मुरडली तेही मनातल्या मनात हे तुम्ही समजूनच गेले असाल.

“मग घेतली का गाडी? चार चाकी??”

“कुठे ग? तू ऐकलं नाहीस का सध्या अलिखित नियम आहे की सगळ्यांनी सार्वजनिक वाहनातूनच प्रवास करावा!” प्रत्येक वाक्यावर शक्य तितका जोर देऊन आणि अतिशय वाकड तोंड करून माझी ती मैत्रीण बोलत होती.

त्यातली चौथी पहिलीला म्हणाली “काय ग तू आज छान सावजी भाजी करून आणणार होतीस ना? आणली की नाही मग?”

जीने हा प्रश्न विचारला, तिलाच चौथीने प्रतीप्रश्न केला, “तू पण भजे करून आणणार होतीस आणलेस का?”

“छे ग कसले भजे आणि कसलं काय? एकतर आमचे अहो मागल्या महिन्यापासून डायट वर आहेत आणि आता तर तेलही कमी वापरा असा फतवाच निघाला आहे.” तिच्या या वाक्यावर आम्ही सगळ्यांनी खोल उसासे टाकले.

आता तुम्ही सांगा वाचकहो आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहिणींनी काय करावे?

©® राखी भावसार भांडेकर नागपूर

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


**********


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →