Login

सरोळीतील पाऊस आणायला जाण्याची प्रथा : धार्मिक श्रद्धा व एकात्मतेचा उत्सव

गावातील सण, उत्सव यांचे जतन केले पाहिजे.

आपले सरोळी गाव अनेक पारंपरिक रुढी व संस्कृतीने नटलेले आहे. गावात सण , उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. गावातील माणसे प्रत्येक उत्सवात आनंदाने सहभागी होतात.शेती हा आपल्या गावाचा कणा असलेमुळे शेतकरी नेहमी शेतात कष्ट करण्यात गुंतलेला असतो.

आपल्या गावात प्रामुख्याने भात व ऊस ही पिकं घेतली जातात.पूर्वी भातासाठी जमीन तयार करताना खूप कष्ट करावे लागत असत. गुढी पाडव्यासून शेतीचे कष्टकाम चालू असायचे. जमीन बैलाच्या साहाय्याने नांगरट केली जायाची. मोठे- मोठे हेंडे लाकडी कोडत्याच्या मदतीने फोडले जायाचे. हे फोडताना हाताला फोड यायचे. हेंडे फोडून जमीन बारीक करुन , कुळव ,पाटे मारुन पेरण्यासाठी जमीन सज्ज केली जाते.मे महिन्यात रोहिणी नक्षत्रात भाताची पेरणी केली जायाची. पाऊस पडल्यावर भाताची उगवण होत असे. भात थोडं मोठे आले की कोळपणीला सुरवात होत होती. यामुळे बराच तणाचा बंदोबस्त होत असे. यानंतर निंदणी , खुरपणी करुन भाताची निगा राखली जात असे. आता भात मोठे झाल्यावर रासायनिक खताचा डोस दिला जायाचा. यामुळे भात तजेलदार व डौलदार भात येत असे. पाऊस सतत असलेमुळे भाताची जोमदार वाढ होत होती. भाताच्या ओप्यामध्ये पाणी तुंबुन राहायचे. मग भर पावसात चिखल कोळपे घातले जायचे यामुळे भात अधिक घट्ट होते व अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत होती.भात उगवणीपासून ही कामे दोन तिन महिने चालू असायची.

पावसाने भाताची वाढ झापाट्याने होत असत त्यामुळे भाताचे पिक चांगले येणार असे वाटत असताना भात पोटरीला असताना , भात परिपक्व होण्यासाठी पावसाची खरी गरज असते अशावेळी नेमका पाऊस जातो. पिकं वाळू लागतात ,निस्तेज झालेलं भात पाहून शेतकरी हवालदिल होतो. त्यावेळी पाण्याचे कोणतेच साधन नसलेमुळे पावसावरच अवलंबून राहावे लागत होते. हातातोंडाशी आलेलं पिक आत्ता जाणार या भावनेने शेतकरी फार दुःखी होतो. गावात प्रत्येक माणसाच्या तोंडात केवळ एकच विषय पाऊस ..! पावसाची वाट पाहून थकलेल्या गावक-यांचे शेवटी मेघराजाला आणण्यासाठी गावात एकमत होते आणि पाऊस आणण्यासाठी गावात दवंडी दिली जाते.

गावातील सगळे लोक संध्याकाळी एकत्र जमतात. भजनाच्या तालात दिंडीला सुरवात होते. अनेक रसभरीत अभंगातून पावसाला साकडे घातले जाते. गावक-यांनी अंतरंगातून पावसाला दिलेल्या हाकेतून खरोखरच पिकाविषयी तळमळ दिसते. भजनात तल्लीन झालेले गावकरी थळदेवाजवळील बिब्बाडीत थांबतात. तिथं पावसाच्या नावाने एक दगड पुजला जातो. त्याची मनोभावे पुजा केली जाते. सर्वांनी आणलेला गोड नैव्यद्य समोर ठेवला जातो. पावसाला मनापासून पारंपरिक गा-हाणे घातले जाते. या गा-हाण्याबरोबर ' हे पर्जन्यराजा हातातोंडाशी आलेलं पिकं घालवू नकोस , सारी पिकं तुझी चातकावाणी वाट बघत आहेत , तुझ्याशिवाय आमचं जगणं कठीण आहे,आमच्या काळ्या आईची तहान भागव, सगळी धरती हिरवीगार कर, तुझ्या अमृतधारांनी पिकांची तहान पूर्ण कर , आमचे हे गा-हाणे ऐकून तु धो-धो बरसायला सुरवात कर ..!' ,असे काकळूतीचे मागणे पावसाला घातले जाते. सगळेजण मनोभावे पाया पडतात.आत्ता पाऊस येईल या आशेने थोडा वेळ वाट पाहतात. सगळ्यांचे डोळे आकाशाकडे असतात. प्रत्येकाच्या मनात पार्थनेचा धावा चालूच असतो.

अखेर या मेघाराजाला दया येते आणि आश्चर्य म्हणजे लगेच पावसाच्या सरी पडतात. गावच्या बळीराजाची आर्त हाक पावसाने ऐकल्यामुळे गावातील सारेजण आनंदात घरी परततात. विज्ञान किती जरी अद्यावत तंत्रज्ञानाने पुढे गेले असले तरी अशा धार्मिक विधीने पाऊस पडणे थक्क करणारे आहे.

आपल्या गावात पूर्वीच्या काळात भात ऐन पोटरीला यायच्या वेळेलाच नेहमी पाऊस दगा देत असे त्यामुळे अशा पार्थनेतून पावसाला साकडे घातले जात असत.

पाऊस आणायला जाणे ही महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात जपलेली लोकपरंपरा आहे.या प्रथेमुळे गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. समाजातील ऐकोपा व संकटकाळात सामूहिक भावनेला बळकटी मिळते. शेतीप्रधान संस्कृतीत पावसाचे महत्व अधोरेखीत होते. लोककला व लोकगीते यांचे जतन होते. मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख होते. निसर्गाविषयी आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

पावसासाठी केलेली ही सामूहिक प्रार्थना ग्रामीण समाजातील श्रद्धा, एकता आणि निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचे दर्शन घडवते.विज्ञान युगातही अशा परंपरा सांकृतिक वारशाच्या द्योतक आहेत. त्या जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

*नामदेव पाटील*
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →