Login

एक चुक, दोन न्याय भाग १

एक चुक, दोन न्याय भाग १
एक चुक,दोन न्याय

भाग १

"प्राजू, अगं सोड तो ग्लास ! कुठे लागलं तर नाही ना तुला ? काच टोचली नाही ना पायाला ? अगं, वस्तूंचं काय, आज आहेत उद्या नाही. तू आधी बाजूला हो, अनघा झाडून घेईल ते सगळं."
सासूबाईंनी अतिशय काळजीच्या स्वरात आपल्या लाडक्या लेकीला बाजूला केलं.

अनघा हॉलमध्ये झाडू आणि सुपली घेऊन आली. शांतपणे काचेचे तुकडे गोळा करू लागली. तिने सासूबाईंकडे पाहिलं. तर त्यांच्या चेहऱ्यावर प्राजक्तासाठी असलेली माया आणि काळजी स्पष्ट दिसत होती. प्राजक्ता फोनवर बोलण्याच्या नादात घाईघाईने हॉलमधून जात असताना तिच्या हातातून काचेचे महागडे ग्लास निसटले होते. त्याचे तुकडे झाले होते.

सासूबाई प्राजक्ताशी बोलत होत्या. तिला कुठे जखम झाली नाही ना, हे पाहत होत्या.त्या म्हणाल्या,

"काही नाही गं बाळा, चुकून झालं ना! फोनवर महत्त्वाचं काम होतं तुझं. अद्वैत, बघ ना तुझी बहीण बघ किती घाबरलीये ती. तिला सोफ्यावर बसव. लक्ष दे तिच्याकडे !"

अद्वैतने देखील हातातला लॅपटॉप बाजूला ठेवून दिला. अनघाला पाण्याचा ग्लास आणण्याची खूण केली.बहिणीला पाण्याचा ग्लास दिला.तिच्या हातावरून प्रेमाने हात फिरवला.

इकडे अनघा काचेचे तुकडे गोळा करत असताना तिच्या डोळ्यांसमोरून आज सकाळचाच एक प्रसंग सरकन निघून गेला. परवा सकाळी ऑफिसला निघताना तिची अशीच घाई झाली होती. स्वयंपाकघरात कामं उरकता उरकता डोक्यात ऑफिसच्या प्रेझेंटेशनचे विचार सुरू होते. त्या गडबडीत मिक्सरचं भांडं नीट न लावताच तिने बटन चालू केलं होतं, ज्यामुळे मिक्सरची मोटर जळाली होती.

त्यावेळी मंगलाकाकू हॉलमधून किचनमध्ये तरातरा धावत आल्या होत्या. तिच्यावर जोरात ओरडल्या होत्या. चिडून म्हणल्या,

" अनघा, हा काय प्रकार आहे ? साध्या साध्या गोष्टी कशा हाताळाव्यात याचं भान नसावं माणसाला.? किती बेजबाबदारपणा आहे हा!
नुकसान कोणाचं होतं ? घराचं ना ? जरा डोळे आणि कान उघडे ठेवून काम करत जा!"

आणि त्यावेळी अद्वैतचे वागणं ?
तो नेहमीप्रमाणे काही न बोलता, बायकोची बाजू घेण्याऐवजी तिथेच मान खाली घालून शांत बसून राहिला होता. जणू काही सगळी चूक अनघाचीच होती.
अनघाला मिक्सर जळाला तेव्हा बेजबाबदार आणि निष्काळजी ठरवण्यात आलं होतं, आणि मुलीच्या हातून काच फुटली तेव्हा मात्र तिची काळजी केली जात होती.

खरं तर चूक तर दोघींकडूनही झाली होती. फरक एवढाच होता की, मुलीची चूक अपघात म्हणून प्रेमापोटी लपवली गेली होती, आणि सुनेची चूक मात्र स्वभाव धांदरटपणा म्हणून सगळ्यांसमोर मांडली गेली होती.

कटू होतं, पण हेच या घरचं सत्य होतं. अनघाच्या मनात या दुटप्पी नियमाबद्दल एक ठाम विचार रोवला गेला. तिने मनोमन ठरवलं की आता रडत बसण्याने किंवा स्वतःचा मूड खराब करून तोंड फुगवण्याने मला काहीच मिळणार नाही. पण सासरच्या या मानसिकतेला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आरसा दाखवण गरजेच आहे.

अचानक एक संधी दोनच दिवसांनी चालून आली, जेव्हा रविवारी घरात सासरच्या बाजूचे खास पाहुणे जेवायला येणार होते. मंगलाकाकूंनी स्वयंपाकाची सर्व जबाबदारी अनघावर सोपवली होती...

क्रमशः...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →