उपयोगाचं नातं
भाग १
"अरे समीर, प्लीज यार... फक्त आजचा दिवस! तुला माहितीये ना माझं हे प्रेझेंटेशन किती महत्त्वाचं आहे? जर आज मी क्लायंटला इम्प्रेस केलं नाही, तर माझं प्रमोशन रखडेल. आणि तू तर या विषयातला मास्टर आहेस, फक्त पीपीटी फायनल करून दे ना!" अविनाशने फोनवर अतिशय विनवणीच्या सुरात म्हटले.
समीरने आपल्या घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला स्वतःच्या ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी लवकर निघायचे होते.
"पण अविनाश, आता खूप रात्र झालीये. आणि उद्या माझी स्वतःचीही महत्त्वाची मीटिंग आहे रे..." समीरने अडखळत सांगण्याचा प्रयत्न केला.
"समीर, तूच तर माझा खरा मित्र आहेस! बाकी सगळे तर फक्त पार्ट्यांपुरते असतात. मला माहीत होतं, तू मला नाही म्हणणार नाहीस. मी तुला फाईल्स मेल केल्या आहेत, एकदा बघून घे. थँक्स अ लॉट मित्रा!" उत्तर ऐकण्यापूर्वीच अविनाशने फोन ठेवला होता.
समीरने एक दीर्घ श्वास सोडला. मैत्रीचं कर्तव्य समजून घेत लॅपटॉप उघडला. हे काही पहिल्यांदाच घडत नव्हतं. शाळेपासूनची ही मैत्री समीरने नेहमीच काळजाच्या कोपऱ्यात जपली होती. अविनाश हुशार होता, महत्त्वाकांक्षी होता, पण तितकाच स्वार्थीही होता.
समीरच्या स्वभावातला मऊपणा अविनाशला पक्का ठाऊक होता. समीर कधीच कोणाला 'नाही ...' म्हणू शकत नाही, हेच अविनाशचं सर्वात मोठं हत्यार होतं.
रात्रीचे दोन वाजेपर्यंत समीरने स्वतःची झोप मोडून अविनाशचं काम पूर्ण केलं.
रात्रीचे दोन वाजेपर्यंत समीरने स्वतःची झोप मोडून अविनाशचं काम पूर्ण केलं.
सकाळी डोळे चोळत तो आपल्या ऑफिसला गेला. समीरसाठी नाती म्हणजे गुंतवणूक नसून ती एक जबाबदारी होती. पण अविनाशसाठी नाती म्हणजे गरजेनुसार वापरण्याच्या स्टेपनी सारखी होती.
काही दिवसांनंतर अविनाशच्या पदोन्नतीची बातमी आली. त्याने एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. समीर तिथे पोहोचला तेव्हा अविनाश आपल्या कॉर्पोरेट कलिंग्सच्या गराड्यात होता. समीरने हसून त्याला शुभेच्छा दिल्या,
" काँग्रेट्युलेशन अविनाश! खूप आनंद झाला तुझं प्रमोशन बघून."
अविनाशने फक्त मान डोलवली. तो हसून बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या बॉसशी ओळख करून देताना म्हणाला,
" सर, मीट मिस्टर समीर... हा माझा ओळखीचा आहे. खूप हेल्पफुल आहे, कधी कधी मला बॅक एंड कामात मदत करतो."
'ओळखीचा?' समीरला त्या शब्दाचा अर्थ नीट उमजला नाही. ज्या मित्रासाठी त्याने आपली रात्रीची झोप घालवली, ज्याच्या घराच्या कर्जासाठी मदतीसाठी स्वतःचे पैसे उभे केले, त्या मित्रासाठी तो आज फक्त एक ओळखीचा माणूस होता ? समीरच्या काळजात कुठेतरी एक कळ आली. त्याने आज पहिल्यांदा त्या गर्दीत स्वतःला खूप एकटं अनुभवलं.
त्या रात्री पार्टीत अविनाशने एकदाही समीरशी नीट संवाद साधला नाही. तो फक्त त्या लोकांशी बोलत होता ज्यांच्याकडून त्याला भविष्यात काही फायदा होणार होता. समीर एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याला आठवलं की, गेल्या महिन्यात जेव्हा समीरच्या आईची तब्येत बिघडली होती, तेव्हा अविनाशने साधी विचारपूसही केली नव्हती, कारण त्या वेळी तो आपल्या टार्गेट्समध्ये व्यस्त होता.
" समीर, अरे काय असा कोपऱ्यात उभा आहेस ? ये ना, ड्रिंक्स घे! " अविनाश जवळ येऊन म्हणाला.
" नको अविनाश, मला जरा निघायला हवं. खूप उशीर झालाय." समीर शांतपणे म्हणाला.
"अरे थांब की, अजून केक कापायचा आहे. अरे ऐक ना, जाता जाता ते माझं एक टॅक्सचं काम राहिलंय, जरा बघून देशील का या विकेंडला ? तुला तर माहीतच आहे माझं मॅथ्स किती कच्चं आहे." अविनाशने हसून विचारलं.
जणू काही समीरचं कामच त्याला मदत करणं हेच होतं.
समीरने अविनाशच्या डोळ्यांत पाहिलं. त्या डोळ्यांत मैत्रीची उब नव्हती, तर फक्त स्वार्थाचं गणित होतं. समीरला त्या क्षणी जाणीव झाली की, तो इतके दिवस एका अशा नात्याला पाणी घालत होता ज्याचं झाड कधीच होणार नव्हतं.
समीरने अविनाशच्या डोळ्यांत पाहिलं. त्या डोळ्यांत मैत्रीची उब नव्हती, तर फक्त स्वार्थाचं गणित होतं. समीरला त्या क्षणी जाणीव झाली की, तो इतके दिवस एका अशा नात्याला पाणी घालत होता ज्याचं झाड कधीच होणार नव्हतं.
" अविनाश, मला वाटतं आता तुला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यायला हवी. या विकेंडला मी माझ्या फॅमिलीसोबत बाहेर जाणार आहे." समीरने पहिल्यांदाच ठामपणे नकार दिला.
अविनाशचा चेहरा क्षणार्धात बदलला.
" काय? तू नकार देतोयस ? अरे इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली, आणि तू एका साध्या कामासाठी नाही म्हणतोयस ? तू तर खूप बदलला आहेस रे समीर!"
समीर काहीच बोलला नाही. तो फक्त तिथून बाहेर पडला. बाहेरच्या गार वाऱ्यात त्याला थोडं हलकं वाटत होतं. त्याने स्वतःशीच ठरवलं की, जो माणूस तुमच्या वेळेची आणि श्रमांची किंमत करत नाही, त्याच्यासाठी स्वतःला झिजवण्यात काहीच अर्थ नाही.
अविनाशला वाटलं होतं की समीर पुन्हा एकदा येईल, माफी मागेल. पण नक्की त्याचं काम करेल. पण अविनाश एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत होता, चांगली माणसं जेव्हा एकदा मनात उतरतात, तेव्हा ती कायमची जातात.
समीरने त्या रात्री घरी गेल्यावर अविनाशचा नंबर ब्लॉक केला नाही, पण मनातून त्याला कायमचा निरोप दिला. पण खरा धडा शिकायचा तर अजून बाकी होता. अविनाशला हे लवकरच कळणार होतं की, उपयोगाचं नातं संपल्यावर खरी अडचण काय असते.
