असमान ओझं
भाग १
" समीरा, मी या महिन्याचा घराचा बजेट प्लॅनर अपडेट केलाय. होम लोनचे २५ हजार, आरवची स्कूल फी १० हजार आणि ग्रोसरीचे १५ हजार... टोटल झाले ५० हजार. मी माझे २५ हजार जॉइंट अकाउंटला ट्रान्सफर केलेत, तू तुझे २५ हजार टाकून दे. परफेक्ट ५०-५० पार्टनरशिप!"
अद्वैतने लॅपटॉप बंद करत अत्यंत अभिमानाने सांगितले. तो स्वतःला खूप समंजस, आधुनिक आणि पुरोगामी विचारांचा नवरा समजायचा.कारण तो घरातल्या प्रत्येक खर्चाचा निम्मा भार अगदी वेळेवर उचलत होता. समीराने दिवसभराच्या ऑफिसच्या कामाने दमूनही चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत मान डोलवली.
तिने तिचे २५ हजार ट्रान्सफर केले खरे, पण लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहताना तिच्या मनात विचार आला,
‘ बँक खात्यातला पगाराचा वाटा तर समान झाला, पण सकाळपासून रात्रीपर्यंत मी या घरासाठी जे शारीरिक आणि मानसिक श्रम करते, त्या अदृश्य ओझ्याचा हिशोब कोणत्या प्लॅनरमध्ये होणार ? ’
समीरा आणि अद्वैत दोघेही कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करत होते. दोघांचे ऑफिस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असेच होते. पण समीराची सकाळ ५ वाजता सुरू व्हायची. डबा बनवणे, ५ वर्षांच्या आरवला उठवून तयार करणे, दूध-भाजीवाल्याचा हिशोब करणे आणि कामवाल्या बाईला सूचना देणे. याउलट, अद्वैत सकाळी ७ वाजता आरामात उठायचा, फ्रेश होऊन चहा घेत पेपर वाचायचा. त्याचं आवरून कंपनीत निघून जायचा.
संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर अद्वैत सोफ्यावर पाय पसरून बसायचा. वर कौतुकाने म्हणायचा,
" समीरा, तू बाकीचा स्वयंपाक कर, मी तोपर्यंत तुला भाजी चिरून देतो हं...
बघ, मी तुला किती मदत करतो!"
बघ, मी तुला किती मदत करतो!"
अद्वैतच्या नजरेत ती खूप मोठी मदत होती, पण समीरासाठी ते तिचंच कर्तव्य होतं.ज्यामध्ये अद्वैत फक्त एक पाहुणा कलाकार म्हणून येत होता. मुलाचा अभ्यास, त्याचे कपडे, त्याचे आजारपण, घरात पाहुणे आले तर करायचे आदरातिथ्य या सगळ्या अदृश्य जबाबदाऱ्या फक्त आणि फक्त समीराच्याच खांद्यावर होत्या. नवरा फक्त आर्थिक वाटा उचलून मोकळा होत होता.
घरातल्या या असमान ओझ्याची खरी परीक्षा एका कठीण प्रसंगी आली. आरवच्या शाळेची पहिली टर्म एक्झाम सुरू होणार होती. नेमक्या त्याच आठवड्यात समीराच्या ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय क्लायंट व्हिजिट येणार होती. समीरासाठी तिच्या करिअरची ही खूप मोठी संधी होती.
पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. रविवारी रात्री अचानक आरवला प्रचंड ताप आला. तो तापाने फणफणत होता. समीरा रात्रभर जागी राहिली. आरवच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, त्याला दर तीन तासांनी औषध देणे यात तिची रात्र कशी निघून गेली, तिला समजलेच नाही. अद्वैत शेजारी झोपला होता, तो रात्री दोनदा उठला, त्याने फक्त
"ताप कमी झाला का?" एवढंच विचारलं आणि पुन्हा कुशी बदलून झोपून गेला.
"ताप कमी झाला का?" एवढंच विचारलं आणि पुन्हा कुशी बदलून झोपून गेला.
सकाळी ७ वाजले. समीराचे डोळे झोपे अभावी आणि त्रासाने लाल झाले होते. अद्वैत छान आवरून, इस्त्रीचे कपडे घालून बाहेर आला. डायनिंग टेबलवर चहा घेत तो सहजतेने म्हणाला,
" समीरा, माझी आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे, मला लगेच निघावं लागेल. तू आरवला बघून घे. आज ऑफिसला सुट्टी घे किंवा वर्क फ्रॉम होम कर."
समीराचा संयम सुटला. तिने अद्वैतकडे पाहिले. तिने शांतपणे त्याच्याकडे बघितलं. त्याला अत्यंत गंभीर आवाजात विचारले,
"अद्वैत, आज माझीही क्लायंट व्हिजिट आहे. वर्षभराची मेहनत आहे माझी त्या प्रोजेक्टवर. आजच्या दिवसासाठी तू रजा नाही घेऊ शकत का?"
अद्वैतने आश्चर्यचकित होऊन सांगितले,
"अगं समीरा, काय बोलतेस ? अगं आयटी कंपनी आहे माझी, माझ्याशिवाय तिथं काम अडकेल. आणि मुळात, मूल आजारी असताना ते आईलाच जास्त शोधतं ना!
तू नेहमीप्रमाणे मॅनेज करशील, मला माहीत आहे. मी संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करेन, हेल्प करेन तुला!"
तू नेहमीप्रमाणे मॅनेज करशील, मला माहीत आहे. मी संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करेन, हेल्प करेन तुला!"
समीराचे काहीही ऐकून न घेता तो निघाला.अद्वैतने कारची चावी घेतली. तो घराबाहेर पडला. समीरा आरवच्या खाटेजवळ हताश होऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पगार अर्धा-अर्धा मागणारा नवरा संकटाच्या वेळी मात्र सगळं ओझं तिच्या एकटीच्या पदरात टाकून निघून गेला होता. या समान वाटा असणाऱ्या नात्यात तिची स्वप्नं, तिचं करिअर आणि तिचा थकवा याला काहीच किंमत नव्हती.
समीराने डोळे पुसले, आरवच्या कपाळावर हात ठेवला आणि तिच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला.
क्रमशः...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
