जुना अल्बम - भाग -1
सकाळचे साडेआठ वाजले होते, "तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला मी काल रात्रीचं सांगितलं होतं नां आज सकाळी माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, टिफिन वेळेवर हवा होता." समीरचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून अस्मिता लगबगिने किचनमधून बाहेर आली.
समीरला आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होतं, त्याने अस्मिताला आदल्या रात्रीचं सांगितलं होतं, उद्या डब्यात पोळी-भाजी नको, थोडा पुलाव करं.
अस्मिता हो म्हणाली होती, पण सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे तीने घाईत थालीपीठ करून डबा भरला, समीरने ऑफिसला निघताना नेमका डबा उघडला आणि त्याचा पारा चढला.
"तुला कशाचं काहीच गांभीर्य नाही, समीर चिडचिड करत बोलला.
"एक दिवस गडबडीत चुकलं माझं तर काय आकाश कोसळलं कां ? मी पण माणूस आहे, मशीन नाही, अस्मिता पण ओरडून बोलली.
समीरने रागात डबा तसाच टेबलावर ठेवला, बॅग उचलली आणि दरवाजा जोरात आपटून बाहेर गेला.
अस्मितानें मागे वळून पाहिलं सुद्धा नाही, तिच्या डोळ्यात पाणी आलं.
समीर आणि अस्मिताचं लग्न होऊन सात वर्षं झाली होती, सात वर्षं म्हणजे संसारातला तो काळ जेव्हा प्रेमाची जागा हळूहळू सवय घेते.
सुरुवातीचे ते 'तू जेवलीस का?' चे मेसेज आता 'लाइटचं बिल भरलंस का?' मध्ये बदलले होते, भांडणं व्हायची, पण ती फार काळ टिकायची नाहीत, पण आजचं भांडण वेगळं होतं, कोणीच झुकायला तयार नव्हतं, दोघांनाही वाटत होतं, चूक समोरच्याचीचं आहे.
दुपारी अस्मिताच्या सासूबाई, सुशिलाकाकू स्वयंपाकघरात आल्या, आणि अस्मिताला म्हणाल्या, जेवायला वाढ.
अस्मितानें त्यांना जेवण वाढलं, पण तिचा चेहरा पडलेलाचं होता त्यात समीरने दुपारीही सॉरी बोलायला फोनही केला नव्हता.
सुशिलाकाकूंना हे अबोले नवीन नव्हते, त्यांनी स्वतःचा संसार बघितला होता, त्यांना माहित होतं, अशा वेळी जास्त उपदेश देऊन उपयोग नसतो,उलट भांडण वाढतं.
संध्याकाळी त्या आपल्या खोलीत काहीतरी शोधत होत्या. कपाटात वरच्या फळीवर एक जुनी लोखंडी पेटी होती. त्यात त्यांच्या काळातले काही महत्त्वाचे कागद होते, पेटी काढताना त्यांच्या हातात समीर आणि अस्मिताच्या लग्नाचा अल्बम लागला.
सुशिला काकूंनी तो हातात घेतला,फुंकर मारून त्यावरची धूळ झटकली, सहज म्हणून पहिलं पान उघडलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.
हॉलमध्ये अस्मिता सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती.
समीर नुकताच ऑफिसमधून येऊन बेडरूममध्ये बसला होता, दोघांमध्ये अजूनही अबोला होता.
"अस्मिता , अगं बघ, हे काय सापडलं!" सासूबाई मुद्दाम मोठ्याने म्हणाल्या, समीर, अरे तू पण ये, इकडे ये बघ, तुझ्या लग्नाचा अल्बम, किती वर्षांनी बघतेय.
'लग्नाचा अल्बम' हा शब्द कानावर पडताच समीर बेडरूमच्या दारात येऊन उभा राहिला. अस्मितानेही चोरट्या नजरेने टेबलाकडे पाहिलं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लग्नाचा अल्बम बघून अस्मिता आणी समीरचा दुरावा कसा मिटतो..)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
